भारतामध्ये रशियाची ‘कोरोना’ वॅक्सीन बनवण्याची तयारी, करारासाठी सुरू झाली बातचीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनेक भारतीय कंपन्या रशियाने तयार केलेल्या कोरोना व्हायरस लस स्पुतनिक व्हीमध्ये रस दाखवत आहेत. भारतीय कंपन्यांनी रशियन डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) ला त्यांनी लसीच्या फेज-१ आणि फेज-२ च्या क्लिनिकल चाचण्यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.

आरडीआयएफ ही रशियाची भांडवल पुरवठा कंपनी आहे. याच कंपनीने कोरोना लस स्पुतनिक व्ही च्या संशोधन आणि चाचणीला अर्थ सहाय्य केले आहे. आरडीआयएफकडेच या लसीच्या मार्केटिंग व निर्यात करण्याचा अधिकार आहे. ही लस जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस आहे. भारतीय कंपन्यांची चर्चा आरडीआयएफकडे पुढे गेली, तर ही लस भारतात तयार केली जाऊ शकते. ही लस निर्यात आणि देशांतर्गत वापरासाठी वापरली जाऊ शकते. एका वृत्तसंस्थेनुसार, मॉस्कोमधील भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

रशियन दूतावासाच्या सूत्रांनी सांगितले की, “भारतीय कंपन्या लस संदर्भात आरडीआयएफशी संपर्क साधत आहेत आणि या कंपन्यांनी फेज-१ आणि फेज-२ चाचणीची तांत्रिक माहिती मागितली आहे. यावेळी सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर तिसर्‍या देशात लस निर्यातीबाबत चर्चा झाली. तसेच देशांतर्गत वापरासाठी लस निर्मितीवरही चर्चा झाली.”

मंगळवारी रशिया हा कोरोनाविरूद्ध लस नोंदवणारा जगातील पहिला देश ठरला. ही लस रशियाच्या मायक्रो बायोलॉजी रिसर्च सेंटर गामालेयाने विकसित केली आहे. ही लस बुधवारी क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात गेली आहे.

रशियामध्ये भारताचे राजदूत वेंकटेश वर्मा यांनी सांगितले की, लस निर्मितीसंदर्भात आरडीआयएफ प्रमुख किरील दिमित्रीव्ह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम येतील अशी त्यांना आशा आहे.