महिला डॉक्टरवर गोळ्या झाडून डॉक्टरची आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या राजधानी ऑस्टिनमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कर्करोगाने आजारी असलेल्या एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने एका महिला डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येनंतर त्याने स्वत: देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. हत्या करताना डॉक्टरने काहीजणांना डांबून ठेवले असल्याचे समोर आले.

भरत नरुमांची असं हत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव असल्याची माहिती पोलिसानी दिली. ४३ वर्षीय डॉ. नरुमांची यांना तिसऱ्या स्टेजचा कर्करोग होता. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्टिन पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी एक व्यक्ती ‘चिल्ड्रेन्स मेडिकल ग्रुप’च्या कार्यालयात शस्त्रांसह घुसला असल्याची माहिती मिळाली. या व्यक्तीने सुरुवातीला काही जणांना ओलीसही ठेवले होते. त्यातील अनेकजणांनी यशस्वीपणे पळ काढला. काही वेळाने हल्लेखोराने कॅथरीन डॉडसन या बाल रोग तज्ज्ञ महिला डॉक्टर वगळता इतर सर्वांची सुटका केली.

हल्लेखोराच्या तावडीतून सुटका झालेल्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, घटनास्थळी असलेल्या हल्लेखोराकडे पिस्तुलसारखे एक शस्त्र आहे. पोलिसांनी हल्लेखोर डॉक्टर नरुमांची आणि डॉ. डॉडसन यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध असल्याची माहिती मिळाली नाही. डॉ. डॉडसनची हत्या केल्यानंतर डॉक्टर नरुमांचीने स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी इमारतीत प्रवेश केल्यानंतर त्यांना या दोघांचा मृतदेह आढळून आला. या घटनेचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.