भारताच्या परराष्ट्र सहसचिवांचा पाकिस्तानच्या एटर्नी जनरलशी हस्तांदोलन करायला नकार

ADV

द हेग: वृत्तसंस्था – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भारताने पाकचा अतिविशेष राज्याचा दर्जा काढून घेतला होता. यानंतर भारताकडून राजनैतिक स्तरावर पाकिस्तानला आणखी काही धक्के दिले जाण्याची शक्याता आहे. भारताच्या या आक्रमक धोरणाचे प्रत्यंतर आज (सोमवार) हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आला.

पाकिस्तानने अटक केलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात सोमवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाहीर सुनावणी होत असून, एकूण चार दिवस ही सुनावणी चालणार आहे. भारतातील प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे भारत सरकारच्या वतीने जाधव यांची बाजू मांडत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारीही हेगच्या न्यायालयात उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या विधिज्ञांची फौजही येथे आहे.

या खटल्यापूर्वी न्यायालयात घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. न्यायालयात आल्यानंतर पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल अन्वर मन्सूर भारतीय परराष्ट्र खात्यामधील अधिकाऱ्यांना भेटायला गेले. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव दिपक मित्तल यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला. मात्र, मित्तल यांनी हस्तांदोलन करायला नकार देत अन्वर मन्सूर यांना दुरूनच नमस्कार केला. हा प्रसंग अनेकांनी कॅमेऱ्यांत टिपला. यानंतर सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा सुरु आहे. दिपक मित्तल यांची ही कृती म्हणजे भारताने पाकिस्तानविरोधात घेतलेल्या आक्रमक धोरणाचे द्योतक असल्याची चर्चा आहे.