कौतुकास्पद ! चक्क फुटपाथवर आहोरात्र अभ्यास करून तिनं मिळवला फर्स्ट क्लास, महापालिकेनं मुलीला दिला फ्लॅट

पोलिसनामा ऑनलाईन – दहावीच्या परीक्षेत 68 टक्के गुण मिळवल्याबद्दल मध्य प्रदेशातील इंदूर महापालिकेने मजुराच्या मुलीला फ्लॅट गिफ्ट देत तिचे कौतुक केले आहे. भारती खांडेकर असे या मुलीचे नाव आहे. भारती कुटुंबासोबत फुटपाथवर राहत होती. तिथेच अभ्यास करत तिने दहावीच्या परीक्षेत हे यश मिळवले आहे.

भारती एका सरकारी शाळेत शिक्षण घेत असून मोठे होऊन आयएएस अधिकारी होण्याची तिची इच्छा आहे. भारतीचे वडील दशरथ खांडेकर रोजंदारीवर काम करतात. त्यांना तीन मुले आहेत. दशरथ कधीही शाळेत गेले नाहीत, पण आपली मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केला. भारतीने आपल्या यशाचं श्रेय आई-वडील आणि शिक्षकांना दिले आहे. मी दहावीत 68 टक्के गुण मिळवले आहेत. माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते. मला शाळेत पाठवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. मी खूप आनंदी असून आयएएस अधिकारी होण्याची माझी इच्छा आहे. आमचा जन्म फूटपाथवर झाला असून तिथेच अभ्यास केला. आमच्या राहण्यासाठी घर नसल्याने फूटपाथवर राहत होतो. मला घर दिल्याबद्दल आणि पुढील शिक्षणाचा खर्च उचलल्याबद्दल मी प्रशासनाची आभारी आहे, अशी प्रतिक्रिया भारतीने दिली आहे.

 

 

 

घर मिळाल्याने भारतीच्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आपली मुलगी मोठी अधिकारी व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीची आई लक्ष्मी यांनीदेखील कधी शाळेची पायरी चढलेली नाही. हे यश मिळवण्यासाठी आपल्या मुलीने खूप मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले.