राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचा मनसेला टोला, म्हणाल्या – ‘तुमच्या शॅडो गृहमंत्र्यांकडून चौकशी करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करत आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांचे स्टेटमेंट ऐकले. मला वाटते आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करावी, अस खोचक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या मुद्द्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा देशपांडे यांनी सरकारला दिला आहे. त्यावरुन चाकणकर यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असे आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाचे असे कुठले आकडे वाढले आहेत, हा प्रश्न आहे. जनतेला भीती घालू नका. विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नसेल तर नका घेऊ. अध्यक्षांची निवड करायची नसेल तर नका करू. पण लोकांना भीती कशाला घालताय, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच सध्या राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना कोरोना कसा काय होतोय, असा प्रश्नही देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तिकडे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र तिकडे कोरोना नाही आहे. गेल्या चार महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन झालं तेव्हा कोरोना पसरला नाही अधिवेशनाच्याच काळात कोरोनाचा फैलाव होतो आहे, अशी शंका देशपांडे यांनी उपस्थित केली आहे.