क्राइम पेट्रोल’ बेतले जीवावर; मुलीचा मृत्यू

मेरठ : वृत्तसंस्था
विविध वाहिन्यांवर दाखवले जाणारे गुन्हेगारी जगतातील कार्यक्रम किती जीवघेणे ठरतात याचे नुकतेच उदाहरण म्हणजे मेरठ मध्ये घडलेली घटना. क्राइम पेट्रोलचा कार्यक्रम पाहत असताना त्यातील एका दृश्याचे अनुकरण लहान मुलाने केले. या भयानक कृत्यात त्या आठ वर्षांच्या मुलीचा गळफास लागून मृत्यू झाला आहे.

या घटनेतील मुलगी सिमरनला वडील मोहम्मद याशिद रागावले होते. त्यानंतर या आठ वर्षीय सिमरन आणि तिचे जवळचे पाच-सहा मित्र-मैत्रिणीनं घरात टीव्ही पाहत बसले होते. टीव्हीवर ‘क्राइम पेट्रोल’ हा कार्यक्रम सुरू होता. क्राइम पेट्रोलमध्ये एक महिला फाशी घेतानाचे दृश्य होते. सिमरनने त्या महिलेची नकल करण्याचा प्रयत्न केला. ती बादलीवर उभी राहिली व ओढणी घराच्या लोखंडी रॉडला बांधली. उभे राहिल्यानंतर बादली खाली पडल्याने सिमरनच्या गळ्याचा फास आवळला व यातच तिचा मृत्यू झाला. अचानक गळ्याला फास बसल्याने तिचे सर्व मित्र-मैत्रिणी बाहेर पळाल्या. सायंकाळी घरी परतल्यानंतर तिच्या वडिलांना या घटनेची माहिती सिमरनच्या मित्रांनी दिली.