International Woman’s Day 2020 : मुंबईतील महिलांना सतावतेय अत्याचाराची ‘अनामिक भीती’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील गुन्हेगारी कमी झाली असली, तरी महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांत मात्र मुंबई शहर दिल्लीपाठोपाठ देशात दुसऱ्या स्थानावर असून शहरातील महिलांना अत्याचाराची एक अनामिक भीती वाटत असल्याची धक्कादायक महिती बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१८ आणि २०१९ वर्षात महिलांवरील अत्याचाराचा आलेख चढाच आहे. २०१८ मध्ये महिलांवरील गुन्ह्यांची संख्या पाच हजार ९७८ इतकी असून २०१९ मध्ये सप्टेंबरपर्यंत चार हजार ८२२ इतके गुन्हे घडले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये केलेल्या एका आरोग्य सर्वेक्षणानुसार मुंबईतील महिलांना सतत अत्याचाराची एक अनामिक भीती सतावत असल्याची बाब समोर आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रतिक सुरंदशे यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यात आम्ही ३०० महिलांशी आरोग्यविषयक समस्यांसाठी संपर्क केला असता यामध्ये यातील अनेक महिलांनी शारीरिक व्याधींसोबतच मानसिक दडपणाखाली असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये अल्पवयीन मुलींच्या आई व त्यांचे नातेवाईक तसेच कामाला जाणाऱ्या महिला तसेच गृहिणी यांचा समावेश होता.

पेपरमधे रोज येणाऱ्या महिला अत्याचाराच्या बातम्या पाहून अनेक महिलाना एका अनामिक भीतीने ग्रासले आहे. अनेक महिलांनी तर माहिती तंत्रज्ञानामुळे आमच्या जीवनात काहीही अघटीत घडू शकते असेही बोलून दाखविले. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे वाढल्यामुळे नागरिकांचे जीवन सुरक्षित झाले असते तरीहि सार्वजनिक ठिकाणी या माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर होताना दिसतो. त्यामुळे आम्हला सार्वजनिक शौचालये, धार्मिक स्थळे अथवा रिक्षा, बस-ट्रेनमधून प्रवासामध्ये आमच्यावर कोणी लक्ष देऊन आहे का? कोणी पाठलाग करीत तर नाही ना ? अशा अनेक शंका-कुशंका मनामध्ये येतात कारण मोबाईल आल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नकळत चित्रण अथवा फोटो काढणे सहज शक्य झाले आहे अशी खंत कामावर जाणाऱ्या महिलांनी व्यक्त केली.

दाटीवाटीने राहत असलेल्या वस्तीमध्ये अनेकवेळा महिलांचे खाजगी क्षण चित्रित करण्याचा धोका असल्याचे अनेक गृहिणींनी बोलून दाखविले. दागिने घालून रस्त्यांवर चालताना सुद्धा मानसिक दडपण येत असल्याचे काही महिलांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याची अनेक कारणे आहेत यामध्ये असामाजिक व्यक्तीमत्व, व्यसनाधीनता आणि लहापणापासून घरातून योग्य संस्कार नसणे. सिगारेट, दारू, चरस, गांजा एवढीच केवळ व्यसनाधीनता राहिलेली नाही, तर त्यात इंटरनेटचाही सहभाग वाढला असून, पोर्न व्हिडीओ पाहण्याचे व्यसन वाढले असल्यामुळे समाजात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन लहान वयामध्ये बिघडण्यास सुरुवात होते.

एकविसाव्या शतकात महिला हि केवळ उपभोगाची वस्तू आहे अशी पारंपारिक, प्रतिगामी मानसिकता बदलणे गरजेचे आहे, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रतिक सुरंदशे यांनी दिली. २०१९ साली महाराष्ट्रात महिलांना आत्महत्या करण्यास उत्तेजन देण्यासाठी ९५१ गुन्ह्याची नोंद झाली होती: यातील अनेक महिलांनी ब्लॅकमेलिंग प्रकरणातून तसेच समाजामध्ये अब्रू जाण्याच्या भीतीने आत्महत्या केल्या होत्या.