अरेव्वा ! आता रेल्वेमध्ये मिळणार ‘मसाज’ अन् ‘शॉवर’ची सुविधा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पर्यटन व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे लोकही लांबचा प्रवास टाळत होते. पण, देशातील रुग्णसंख्या कमी झाली असून, लसीकरणाला ही सुरुवात झाली आहे. त्यातच आता भारतीय रेल्वे सुद्धा हळू हळू पुन्हा रुळावर येत आहे. अनलॉक नंतर ट्रॅकवर उतरणाऱ्या विशेष गाड्यांमधून याची झलक पाहायला मिळत आहे.

IRCTC अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. पर्यंटकांचा वाढता कल लक्षात घेऊन IRCT ने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात आणखी दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन ज्योतिर्लिंग आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी, चंडीगड येथून धावतील. त्याशिवाय ‘पधारो राजस्थान’ या ट्रेनची यात्रा दिल्लीतील सफदरजंग येथून सुरू होईल.

इतके ‘पैसे’ मोजावे लागणार
ज्योतिर्लिंग आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी ही विशेष ट्रेन १२ फेब्रुवारीला चंदीगडहून सुटेल आणि महाकालेश्वर व ओंकारेश्वर मंदिरांना पहिली भेट देईल. ही प्रथम श्रेणीची वातानुकूलित ट्रेन असून, यातून प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला तब्बल २६,७९० रुपये मोजावे लागतील. तसेच, आपण या प्रवासात स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील पाहू शकाल. तर, १२ फेब्रुवारीला ‘पधारो राजस्थान’ ही विशेष ट्रेन दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून सुटेल.

द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोचच्या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासी भाडे २२,३८० एवढे निश्चित करण्यात आले आहे. या दोन गाड्यांच्या तिकीट रकमेमध्ये जेवण, हॉटेलमधील मुक्काम आणि रेल्वे स्थानक ते पर्यटन स्थळांपर्यंतची वाहतूक सुविधा, त्याचसोबत प्रवासी विमा या गोष्टींचा समावेश आहे. प्रवासादरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करण्यात येणार आहे.

ट्रेनमध्ये मसाजची सुविधा उपलब्ध होणार !
या विशेष गाड्यांमध्ये आधुनिक पँट्री कार, दोन भोजनालय, कोचमध्ये शॉवर सोबत स्नानगृह, सेन्सर आधारित शौचालय आणि फूट मसाजची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कोचमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षही तैनात करण्यात आले आहे.