इरफान खान भारतात परतला ‘या’ दिवशी करणार शूटिंगला सुरुवात

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लंडन मध्ये वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आता इरफान मायदेशी परतला आहे. इरफानच्या काही जवळच्या सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या तो मुंबईत असून एका रुग्णालयात उपचार घेत आहे. तसेच लवकर तो ‘हिंदी मिडीयम २’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात करणार आहे.

२२ फेब्रुवारीला चित्रपटाच्या शूटिंगला सुरवात होणार आहे. असे वृत्त समोर आले आहे. अद्याप या चित्रपटाची हिरोईन ठरलेली नाही.काही दिवसापूर्वी इरफानच्या अपोझिट या चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून करीना कपूरला कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र करिनाने तूर्तास कुठलाही खुलासा केलेला नाही.

२०१७ मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग आला होता. साकेत चौधरीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भारतीय शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात इरफान सोबत पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. परंतु भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणल्यानंतर पुन्हा ती या चित्रपटात दिसणार नाही. त्यामुळे या सीक्वलसाठी नव्या हिरोईनचा शोध सुरु आहे.

गेल्या वर्षी इरफान खानला कॅन्सर झाल्याचे समजले होते. त्याच्यावर उपचार घेण्यासाठी इरफान लंडनला गेला होता. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा करत एक भावुक पोस्ट लिहिली होती. या आजाराविषयी माहिती कळताच बॉलिवूडच्या कलाकारांसह त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.