राज्यातून पहिल्यांदा शोधलेल्या बेडकाला मिळाली ओळख

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन टीम –  खंडाळा येथे स्कॉटलंडमधील प्राणिशास्त्रज्ञ थॉमस नेल्सन अन्नंदाले यांनी १९१९ मध्ये शोधलेल्या ‘क्रिकेट फ्रॉग’ या बेडकाचा रंग आकारमानात मोठ्या प्रमाणात विविधता असल्यामुळे शास्त्रज्ञांना त्याची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. मात्र आता पुणे व उत्तर-पश्‍चिम घाटातील क्रिकेट फ्रॉग वर्गातील बेडकांचा अभ्यास करून ‘मीनरवारीया सह्याद्रेननिस’ प्रजातीतील बेडूक हे क्रिकेट फ्रॉग प्रजातीमधीलच आहेत. त्यामुळे क्रिकेट फ्रॉगच्या १०० वर्षांपूर्वी शोधलेल्या प्रजातीची ओळख पटल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. एस. पंडित, डॉ. समाधान फुगे, अजिंक्‍य पाटील व झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियामधील डॉ. के. पी. दिनेश यांच्या नेतृत्वात कार्यरत असणाऱ्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. ‘झुटेक्‍सा’ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकामध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. विभागाच्या स्थापनेपासून ‘झुटॅक्‍सा’मध्ये प्रसिद्ध झालेला हा पहिलाच शोधनिबंध आहे.

संशोधकांनी या अभ्यासासाठी संपूर्ण पश्‍चिम घाटामधून ‘मीनरवारीया सह्याद्रेननिस’ बेडकांचे नमुने गोळा केले. हा बेडूक पश्‍चिम घाटामध्ये वेगवेगळ्या रंगरूपांमध्ये अस्तित्वात आहे. यापूर्वी या बेडकाचे जनुकीय नमुने उपलब्ध नसल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. यामुळे त्यांच्या उत्क्रांती व वावराबद्दल कोणतेही अनुमान काढता येत नव्हते, असे त्यांना आढळून आले.

जनुकीय माहितीचा संशोधनासाठी उपयोग
‘मीनरवारीया सह्याद्रेननिस’ हा बेडूक संपूर्ण भारतीय उपखंडात अस्तित्वात असण्याची शक्‍यता डॉ. दिनेश यांनी व्यक्त केली. या संशोधनामुळे बेडकांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी जनुकीय माहितीचा खूप उपयोग होतो यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाला आहे. २०१७ पासून हा अभ्यास सुरू होता.

दरम्यान, बेडूक इतर प्रजातीच्या ऍग्रिकोला बेडकांशी समागम करून संकरित पिले जन्माला घालतो. परंतु, अशी संकरित पिले जगू शकत नाहीत. हा बेडूक किरकिरा आवाज करतात; म्हणूनच त्यांना क्रिकेट फ्रॉग (रातकिडा बेडूक) म्हणतात.

आकार, आवाज आणि जनुकीय चाचण्यांच्या आधारे बेडकांची ही जाती पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या क्रीपटीक स्पेशिजची गूढ प्रजाती असल्याचा दावा संशोधनातून केला आहे. डीएनए बारकोड डेटासह जनुकीय बदलांच्या समस्येवर लक्ष देणारे हे एक महत्त्वपूर्ण संशोधन आहे. हे संशोधन इतर वर्गातील प्राण्याच्या संशोधकांसाठी उपयोगात येईल. तसेच, या अभ्यासामुळे तरुण संशोधकांना प्रेरणा मिळेल.
– प्रा. आर. एस. पंडित, माजी विभागप्रमुख, प्राणिशास्त्र विभाग