‘शिक्षकांना धड मराठी कळत नाही, त्यांची शिक्षणावर निष्ठा राहिली नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारी शाळेतील शिक्षकाला धड मराठी कळत नाही. शिक्षकांची शिक्षणावर निष्ठा राहिली नाही असे म्हणत माजी संमेलनाध्यक्ष आणि माजी प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शिक्षकांचे कान टोचले. सरकारी शाळेतील शिक्षकाला धड मराठी कळत नाही. शिक्षकांची शिक्षणावरची निष्ठा राहिली नाही. मग, मुलांना शिक्षा करण्याचा, नापास करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ? आपण राष्ट्राची हानी करत आहोत याचा विचार कधी केला आहे का ? असे वक्तव्य त्यांनी केले. शिवाय खासगी शाळांपेक्षा सरकारी शाळांमधील शिक्षकांचे पगार अधिक आहेत असेही ते म्हणाले.

‘मराठी शाळांचे भवितव्य’ या विषयावर भारतीय शिक्षण संस्था आणि राष्ट्र सेवा दलाचे शिक्षण प्रशासक मंडळ यांच्या वतीने एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. भारतीय शिक्षण संस्था (जे. पी. नाईक प्रशिक्षण केंद्र) येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजवादी अध्यापक सभेचे शरद जावडेकर होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “सरकारी शिक्षकांसाठी सातवा वेतन लागू होत आहे. दुसरीकडे खासगी शाळांमधील शिक्षक थोडक्या पगारात काम करतात. तिथे तुलनेने चांगले शिक्षण दिले जाते. सरकारी शाळांची अवस्था दयनीय झाली आहे.” इतकेच नाही तर, ‘याला सरकारी धोरणं जबाबदार आहेतच, पण शिक्षकही जबाबदार आहेत’ अशी टीका देशमुख यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, “केवळ पाच टक्के विद्यार्थी कौशल्य शिक्षण घेत आहेत. विज्ञान शिक्षण तर लांबच आहे. प्रादेशिक भाषेत विशेषत: मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे. शिक्षक कमी पडत आहेत. कारण शिक्षणावरची निष्ठा आपण गमावून बसलो आहोत. सावकार शिक्षक झाले आहेत. पुणे शहर, जिल्हा येथेही गुणावत्ता कमी असेल तर इतर जिल्ह्यांचे काय? आपण साधे प्राथमिक शिक्षण देऊ शकत नाही” अशी खरडपट्टी देशमुख यांनी काढली.