‘खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?’; भाजप आमदाराचे मोठे विधान

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याशी संबंधित अशा 10 ठिकाणांवर छापेमारीची कारवाई करण्यात आली. यावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून ‘खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून केला होता. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. याच चौकशीदरम्यान सीबीआयने देशमुख यांच्याशी संबंधित 10 ठिकाणांवर छापे टाकले. त्यावर बोलताना अतुल भातखळकर म्हणाले, ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल, घरावर सीबीआयचे छापे पडले असून, निवासस्थानासह 10 ठिकाणी सीबीआयच्या पथकांच्या धाडी. ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे’.

तसेच अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर? असा प्रश्न उपस्थित करत खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच…’असेही त्यांनी म्हटले. याशिवाय सीबीआयने अनिल देशमुखांवर एफआयआर दाखल केला. हे अतिशय स्वागतार्ह आहे. आता या प्रकरणातील खरा सचिन वाझे कोण हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं पाहिजे !, असे भाजपने ट्विट करून म्हटले आहे.