जे. पी. गुप्ता यांची ‘उचलबांगडी’, ‘सारथी’च्या अतिरिक्त पदी के. डी. निंबाळकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे. पी. गुप्ता यांना सारथीवरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याजागी आता किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ची ताप्तुरती व्यवस्था म्हणून पुढील आदेश येईपर्यंत किशोर राजे निंबाळकर हे कारभार पाहतील.

गुप्ता यांच्यावर सारथीच्या स्वायत्ततेवर गदा आणल्याचा आरोप आहे. सरकारला अंधारात ठेऊन ते परस्पर निर्णय घेत असल्याचा ठपकाही जे. पी. गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला होता.

11 जानेवारीला पुण्यात खासदार संभाजीराजेंनी सारथी संस्था वाचवण्यासाठी उपोषण केले होते. त्यादरम्यान संभाजी राजेंनी उपोषणकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की आपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोन झाला आहे. चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत सारथीची स्वायत्तता कमी होणार नाही.

यावेळी उपस्थित मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की जे. पी. गुप्ता यांना आपण तात्काळ बाजूला करत आहोत, आता त्यांचा कोणताही हस्तक्षेप या संस्थेत होणार नाही. त्यांनी काढलेले सर्व जीआर रद्दबातल करण्यात आले आहेत. जे. पी. गुप्ता ओबीसी मंत्रालयाचे प्रधान सचिव होते. पुण्यास सारथी संस्था वाचावी म्हणून करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सारथीचा अतिरिक्त कारभार आता भारतीय प्रशासकीय सेवेतील आणि महसूल, वनविभागाचे सचिव (मदत आणि पुर्नवसन) किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे सोपावण्यात आला आहे.

सारथीचे नवे प्रमुख निंबाळकर म्हणाले की, जर सारथी संस्थेतील व्यवहारात अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी केली जाईल आणि यासंबंधित अहवाल राज्य शासनाकडे सोपवण्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/