‘कोरोना’मुक्त पोलीस देणार ‘कोरोना’ बाधितांना ‘जीवनदान’, प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे शहरात देखील कोरोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. याच दरम्यान रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले. आता कोरोनामुक्त झालेले हे पोलीस कोरोना बाधितांना जीवनदान देणार आहेत. कोरोनामुक्त झालेले राज्य व केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान प्लाझ्मा दान करून इतर बाधित रुग्णांना जीवनदान देणार आहेत.

पोलिसांकडून याची सुरुवात आज (शुक्रवार) पासून ससून रुग्णालयात सुरु झाली आहे. राज्य राखीव दलाच्या सहा जवानांना प्लाझ्मा दान केले आहे. यापुढेही टप्प्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनामुख्त नागरिकांच्या रक्तामध्ये विषाणुशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून अन्य रुग्णांना दिल्यास त्यांच्यामध्येही वेगाने प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे.
या थेरपीसाठी कोरोनामुक्त झालेल्यांचा प्लाझ्मा आवश्यक असतो. त्यामुळे जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशांनी प्लाझ्मा दान करावा असे आवाहन करण्यात येत आहे. यातूनच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान पुढे आले आहेत. पहिल्या टप्प्यात 16 जवान पात्र ठरले आहेत. त्यातील 6 जणांनी आज प्लाझ्मा दान केले यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी, डॉ. गणेश लांडे, डॉ. शंकर मुगावे आदी उपस्थित होते. डॉ. मुरलीधर तांबे यांच्या हस्ते जवानांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी डॉ. तांबे म्हणाले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही प्लाझ्मा दान करणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांचे प्लाझ्मा दान सुर होईल. एका प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुणे विभागातील सुमारे 200 जवान कोरोना बाधित झाले होते. त्यातील 85 जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यापैकी 65 जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले असून जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठवले जाईल, असे राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी यांनी सांगितले.