जय महाराष्ट्र ! शिवसेनेच्या आमदारानं रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी चक्क स्वतःची 90 लाखांची FD मोडली, दिली जनतेला सेवा

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेमडेसिविर इंजेक्शन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी आणि जीव महत्त्वाचे मानून आमदार संतोष बांगर यांनी आपले कर्तव्य दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे. सरकारी काम अन् सहा महिने थांब, असा अनुभव नेहमीच येत असतो. याच चाकोरीत रेमडेसिविर अडकले. हे न पाहवल्याने आमदार संतोष बांगर यांनी स्वत:ची बॅंकेतील एफडी मोडून 90 लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले आहेत.

आमदार बांगर यांनी सुरुवातीला मतदार संघात मोफत इंजेक्शन वाटप केले. मात्र जिल्ह्यातील इंजेक्शनचाही स्टॉक संपल्याने अडचणी वाढल्या. जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन्स मागवायचे तर एवढी मोठी रक्कम गुंतवल्यानंतर प्रशासनाकडून ती वेळेत मिळेल की नाही. उशिर झाल्यास व्याजाचा भुर्दंड कोणी सोसायचा म्हणून एकही वितरक इंजेक्शन्स मागवत नव्हते. आमदार बांगर यांना ही बाब समजताच त्यांनी एका खासगी वितरकास स्वत:च्या FD तून 90 लाखांची रक्कम उपलब्ध करून दिली. यातून उपलब्ध होणा-या इंजेक्शनच्या पुरवठ्यानंतर संबंधित वितरकास जिल्हा प्रशासन जेंव्हा निधी देईल, तेंव्हा तो आमदार बांगर यांना मिळणार आहे. याबाबत आमदार बांगर म्हणाले, कोरोनाचे संकट अतिशय वाईट आहे. लोकांचे जीव वाचविण्यासाठी जे शक्य आहे, तेवढे करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोरोना वाॅर्डात फिरतो तेंव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे इंजेक्शनसाठीची अडचण दूर करण्यासाठी मदतीचा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.