एकनाथ खडसेंनी सांगितलं जळगाव महापालिकेतील विजयाचे ‘गुपित’, म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा नेते गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगाव महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. 27 नगरसेवक फुटल्याने भाजपाने महापालिकेमधील सत्ता गमावली आहे. हे भाजप आणि महाजन यांचे मोठे अपयश मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा विजय मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर हे सगळ कस जुळून आलं याचा फॉर्म्युलाच खडसे यांनी सांगितला आहे. गेल्या 10 दिवसांत फासे पलटल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

जळगावात भाजपाची एकहाती सत्ता होती. पण कामे होत नसल्यामुुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे महापालिकेत भाजपाला पराभवाची धूळ चारायची हा सगळा प्लॅन होता. पण गेल्या 10 दिवसांत त्याला वेग आला अन् सर्वकाही जुळून आल्याचे खडसे म्हणाले. आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावा लागला नाही. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील खडसेंनी सांगितले. 10 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करेन. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटून गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले 22 होते, शिवसेनेचे 15 होते आणि एमआयएमचे 3 आमच्याकडे आल्याचे खडसे म्हणाले.