Jalgaon News : पपई घेऊन जाणारा  ट्रक उलटून 15 जण जागीच ठार; एकाच कुटुंबातील 10 जणांचा समावेश

जळगाव : धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणारा ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात 15 मजूरांचा मृत्यु झाला. हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव येथे झाला. पपईने भरलेला ट्रक रावेरकडे जात असताना रस्त्यावरील मोठा खड्डा चालकाला न दिसल्याने त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून हा ट्रक उलटला व आतील सर्व 21 मजूर ट्रकखाली दबले गेले. हा अपघात अंकलेश्वर बर्‍हाणपूर राज्यमार्गावर किनगाव येथे पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.

पपईने भरलेला ट्रक उलटल्यानंतर बराच वेळ या अपघाताची माहिती कोणाला समजू शकली नाही़ अपघाताविषयी नागरिकांनी तातडीने घटनास्थळी जाऊन लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे सर्व जण पपईखाली दबले गेले होते़ त्यातील 15 जणांचा जागीच मृत्यु झाला.  त्यातील 10 जण एकाच कुटुंबातील आहेत. इतरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दोघे जण गंभीर जखमी आहेत. हे सर्व मजूर रावेर तालुक्यातील अभोंडा केराळे व रावेर येथील राहणारे असल्याचे सांगण्यात येत आहे.