जम्मू-काश्मीर : तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात यश आले. मृत्यू झालेल्यांपैकी एक दहशतवादी हा जैश- ए- मोहम्मदशी संबंधित होता, तर अन्य दोघे जण हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.

पुलवामा जिल्‍ह्यातील त्राल परिसरात सुरक्षा दलांना दहशतवादी लपून बसल्‍याची माहिती मिळाली. मिळालेल्‍या माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरु करण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्‍युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्यात यश आले.

जुबैर अहमद भाट उर्फ अबू हुरायरा, शकूर अहमद पेरे उर्फ जाफर आणि तावेसे अहमद थॉकर उर्फ अबू ताल्हा अशी ठार करण्यात आलेल्‍या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. सुरक्षा दलाच्या प्रवक्‍त्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, जुबईर हा  दहशतवादी ‘जैश-ए-महंमद’ संघटनेतील आहे, तर, इतर दोघे  हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे आहेत. चकमकीचे वृत्त समजताच अवंतीपोरामधील स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले. या दगडफेकीत किमान नऊ जण जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्‍मू आणि काश्मीरमध्ये थैमान घालणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लष्कराने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ मोहिमेला २०१८ मध्ये मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एकूण २६० दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकूण ९५ जवान शहीद झाले. यात जम्मू- काश्मीर पोलीस दलातील ४५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.