दशतवाद्यांचा CRPF आणि पोलिसांवर हल्ला, एक जवान व नागरिक जखमी

जम्मू-काश्मीर : पोलीसनामा ऑनलाईन – दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात एका पोलीस कर्मचा-यासह एक नागरिक जखमी झाला आहे. श्रीनगरच्या शाजगरियापोरा परिसरात रविवारी (दि. 6) दुपारी ही घटना घडली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शाजगरियापोरा परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.

फारूख अहमद असे जखमी पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. तर अन्य एका व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम रविवारी दुपारी श्रीनगरमधील शाजगारियापोराजवळ गस्त घालत होती. यादरम्यान, याठिकाणी आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शाजगारियापोरा येथील नाक्यावरील टीमवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी फारुख अहमद आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शाजगारियापोरा भागात शोध मोहीम सुरू केली आहे. परिसरात दहशतवादी अजूनही लपले आहेत, असे सांगण्यात येते. दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हा हल्ला घडवून आणला, त्यावरून असे दिसते आहे की, दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षक हे गस्त घालण्यासाठी येणार आहेत, हे आधीच माहित होते.