सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी : पुणे महापालिका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली की भाऊ रंगारी यांनी? यावरुन गेल्यावर्षी मोठा वाद निर्माण झाला होता. आता हा वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर नव्याने माहिती अपडेट करण्यात आली असून यामध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली असे म्हटले आहे. दरम्यान, संकेतस्थळावर हे बदल कुणी केले हे माहित नसल्याची प्रतिक्रिया महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.

[amazon_link asins=’B01L1IULRG,B01MFXCZ5A’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’82d2d2a0-a829-11e8-affb-1f430012951b’]

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक टिळक की रंगारी यावरून मागच्या वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवात मोठा वाद उफाळला होता. भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे म्हणत भाऊ रंगारी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपोषणालाही बसले होते. यावर्षीचा गणेशोत्सव सुरू होण्याच्या आधी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर रंगारी यांनी प्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे नमूद केल्याने आता पुन्हा हा वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे महापालिकेने संकेतस्थळाव अपडेट केलेल्या माहितीत म्हटले आहे की, रंगारी यांनी पुण्यात १८९२ साली सर्वात पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. या अपडेटेड माहितीमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे संस्थापक कोण? या वादावर आपसुकच पडदा पडला आहे. मात्र, हे सर्वांच्याच पचना पडणार का? हा प्रश्न असल्याने पुन्हा नवा वाद सुरू होऊ शकतो.

गेल्यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण झाल्याने पुणे महापालिकेने जंगी कार्यक्रमांचे आयोजनही केले होते. या कार्यक्रमाच्या लोगोवरून वाद निर्माण झाला होता. तसेच गणेशोत्सवाची सुरुवात नक्की कोणी केली याचा वाद उफाळून आला होता. या वादातून पुणे महापालिकेने उत्सवासाठी तयार केलेला लोगो बदलण्याची वेळ आली होती. कारण, महापालिकेने तयार केलेल्या लोगोवर टिळक किंवा रंगारी या दोघांपैकी कुणाचेच छायाचित्र नव्हते. मात्र, पालिकेच्या कार्यक्रमात भाऊ रंगारींचा फोटो लावा अशी मागणी रंगारी मंडळाने केली होती. भाऊसाहेब रंगारींनी १८९२ साली पुण्यात पहिला सार्वजनिक गणपती बसवला. १८९३ साली भाऊ रंगारींसोबत कृष्णाजी खासगीवाले आणि गणपतराव घोटवडेकर यांनीही त्यांच्या परिसरात सार्वजनिक गणपती बसवण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळकांनी या उपक्रमाचे केसरीमध्ये अग्रलेख लिहून अभिनंदन केले. १८९४ साली लोकमान्य टिळकांनी स्वत: राहात असलेल्या विंचुरकर वाड्यात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, असा भाऊसाहेब रंगारी मंडळाने दावा केला होता. तर दुसरीकडे लोकमान्य टिळकांचे चरित्रकार डॉ. सदानंद मोरे यांनी मात्र टिळकांमुळेच गणेशोत्सव सार्वजनिक झाल्याचा दावा केला होता.