धक्कादायक ! JNU मध्ये हिंसाचारावेळी हल्लेखोरांकडून ‘कोडवर्ड’चा वापर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी आणखी एक नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेएनयुमध्ये झालेला हिंसाचार घडवून आणण्यात आला होता. ज्या ठिकाणी हाणामारी झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. यासोबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूमालानं चेहरा लपवलेल्या गुंडांनी कोडवर्डचा वापर करुन हिंसाचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जेएनयु प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या परिसरामध्ये 8 ऑक्टोबरपासून वसतिगृहाची फी वाढवल्याविरोधात छात्रसंघासोबत इतर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. फी वाढीचा निषेध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेमिस्टर परीक्षेवर बहिष्कार घातला होता. डाव्या संघटनांनी दोन दिवस सर्व्हर रूम ताब्यात घेतली होती. त्यांनी विद्यापीठातील रजिस्ट्रेशन प्रक्रियाही बंद पाडली होती. पुढच्या सेमिस्टरचं रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम तारीख रविवारी असल्याने काही विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले होते.
विद्यार्थी रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेले त्यावेळी डाव्या संघटनांनी त्यांना रोखले आणि त्यांच्यासोबत हुज्जत घातली. याच दरम्यान धक्काबुक्की आणि बाचाबाची झाल्यामुळे वातावरण तापलं.

ही घटना घडत असताना काही शिक्षक आणि सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस देखील उपस्थित होते. संध्याकाळी सातच्या सुमारास चेहऱ्यावर रूमाल बांधलेल्या तरुणांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने विद्यापीठ परिसरात घुसखोरी केली. यावेळी सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या पोलीसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली.
पोलीसांना धक्काबुक्की केल्यानंतर पीसीआर कॉल देण्यात आला होता. या घटनेदरम्यान ABVP संघटनेचे विद्यार्थी कमी होते मात्र नंतर व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियाचा वापर करून बदला घेण्याची योजना आखण्यात आली. आखलेल्या योजनेनुसार काही कोडवर्ड वापरण्यात आले. हल्ल्यादरम्यान नेमका कोणी कोणावर हल्ला करायचा हे समजण्यासाठी याचा वापर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/