मग योग्य कोण, पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही़? जयंत पाटील यांचा फडणवीस यांना जोरदार टोला़

मुंबई : कोणत्याही कारणावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न भाजप विशेषत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याकडून सातत्याने होत आहे. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. त्यात महाराष्ट्राच्या कोरोना लढाईचे कौतुक केले आहे. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचा आभास निर्माण करीत असल्याची टिका केली होती. मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे, असा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

त्यावर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट रिट्वीट करत सवाल उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीसजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र सरकारने कोविड १९ चा प्रसार रोखण्याकरीता केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले, मला आशा आहे की याची आपल्याला जाणीव असेल़ तसेच आता मुख्य प्रश्न असा आहे की योग्य कोण, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी की तुम्ही? असा टोला लगावला आहे.