Jayant Patil : ‘पंतप्रधानांना बांगलादेश मुक्तीच्या लढयात नक्की कधी अटक झाली?, कोणते पोलिस स्टेशन?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बांग्लादेशाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बांग्लादेशाचा स्वातंत्र्यलढा माझ्यासाठी पहिले आंदोलन होते. त्यावेळी मला अटकही झाली होती, असे म्हटले होते. आता या विधानावरून राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा. मात्र पंतप्रधानांना बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले. त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात ठेवले होते, याची माहिती त्यांनी दिली, तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल, असे म्हणत पाटील यांनी चिमटा काढला आहे.

मी बांग्लादेशातील बंधूभगिनी आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणे हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनापैकी एक आंदोलन होते. त्यावेळी मी 20-22 वर्षांचा असेन, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेंव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती असे मोदी म्हणाले होते. यावर पाटील यांनी निशाणा साधला आहे.