आबा असते तर सत्तारुढ पक्षाला, खुद्द मुख्यमंत्र्यांना नाकी नऊ आले असते : जयंत पाटील

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विरोधात असताना आर. आर. आबा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडायचे. आज पक्षाला आबांची गरज आहे. आज जर आबा असते तर सत्तारुढ पक्षाला, खुद्द मुख्यमंत्र्यांना नाकी नऊ आले असते, असे मनोगत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.

आज सांगली येथील मिरज रस्त्यावरील महात्मा गांधी विद्यार्थी वसतीगृहाच्या आवारातील नियोजित आर. आर. पाटील स्मृती स्मारकाच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध पक्षांतील मान्यवर नेतेमंडळी यानिमित्ताने एका व्यासपीठावर आली. सुमारे अठरा कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सुमन पाटील यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की आबांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी तासगाव मतदारसंघावर छाप टाकली. सत्तेत राहून त्यांनी नेहमीच जनतेसाठी भूमिका मांडली. सत्तेत त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे लोकांसाठी सोने केले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी हानी झाली याचे मोठे शल्य मला आहे, असे ते म्हणाले. मंचावर बसलेल्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना चिमटा काढताना जयंत पाटील म्हणाले की आर. आर यांनी महाराष्ट्रात अनेक योजना आणल्या. त्यांनी त्या योजना यशस्वीही करून दाखवल्या म्हणूनच की काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचाच आदर्श घेऊन स्वच्छ भारत अभियान सुरु केले असे वाटते.

आर आर पाटील यांची स्तुती करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आबांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आर.आर.पाटील यांच्यासारखे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेते अल्पकाळात निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विविध नेत्यांवर, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले मात्र आबांवर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत, याचाही त्यांनी उल्लेख केला.