जळगाव महापालिकेत भाजपला धक्का, जाणून घ्या नेमकं काय झालं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –    जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी (दि. 18) झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचा दारूण पराभव केला आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव करत महापौरपदी आपले नाव निश्‍चित केले. महाजन यांना 45 मते तर कापसे यांना 30 मते मिळाली. तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली आहे. भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने आणि एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मिळवली आहेत.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. यावेळी महापौर-उपमहापौर यांच्या अर्जावर भाजपने आक्षेप घेतला. दोन्ही उमेदवारांचा सूचक अनुमोदक यांचे नाव राजपत्राचा नियमानुसार नसल्याचा दावा भाजपने केला. अ‍ॅड. सुचिता हाडा यांनी याबाबतचा आक्षेप घेत स्वाक्षरीमध्ये तफावत असल्याचा आरोप केला. तर गटनेते भगत बालानी यांनी देखील आक्षेप घेत महापौर उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाइन घेऊ नये, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांचा आक्षेप फेटाळून लावला आहे. अ‍ॅड. हाडा यांचा आक्षेप फेटाळल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.