जीप-होंडासिटीच्या अपघातात 5 जण जखमी; गाडीत सापडल्या जिलेटीनच्या 3 कांड्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शिराळ्यातील औढी येथे जीप आणि होंडा सिटी यांची सोमवारी रात्रीच्या वेळीस समोरासमोर जोरात धडक झाली आहे. या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. तर होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या ३ कांड्या सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यावेळी अपघात झालेल्या होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. तर या घटनेवरून विनापरवाना स्फोटके गाडीत बाळगल्याबद्दल आणि अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, हा अपघात सोमवार दि.५ रोजी रात्री ८ च्या सुमारास घडला आहे. जीप ( MH04- Q5918) ही जीप करमाळे येथून शिराळा कडे आणि होंडा सिटी ही (MH01YA2449) शिराळा कडून करमाळे कडे निघाला होती. होंडा सिटीच्या चालकाने वेगाने येऊन जीपला धडक दिली. यामुळे जीप पलटी झाली.

जीप मधील फिर्यादी बबन बाळू पाटील, हणमंत मोहिते, राजाराम कदम, भानुदास माने, भगवान माने (रा.करमाळे ता.शिराळा) हे ५ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान, गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या ३ कांड्या सापडल्या आहेत. याबाबत गुन्ह्यांचा तपास पीएसआय अविनाश वाडेकर आणि एएसआय कुमार वायदंडे हे करत आहे.