जेजुरी : जीवनात शिक्षणाबरोबर संस्कार देणारे ज्ञानपीठ म्हणजे ‘प्राथमिक शाळा’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात मानव अशांत व बेचैन झालेला पहावयास मिळतो. प्रगतीच्या नावाखाली तो स्वार्थी व संकुचित स्वभावाकडे ओढला जात आहे. अशातच जर त्याला व्यवहारिक जीवन जगताना योग्य विचाराची दिशा मिळाली नाही तर तो निश्चितच भरकटतो. जर बालपणी शाळेत मिळालेली संस्काराची शिदोरी त्याच्याकडे असेल तर तो देशाचा चांगला नागरिक होऊन आपले जीवन सुखाने समाधानाने जगू शकतो. आणि म्हणूनच “बालपणी शिक्षणाबरोबरच संस्कार देणारे ज्ञानपीठ म्हणजे प्राथमिक शाळा होय.” असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार विजयकुमार हरिष्चंद्रे यांनी केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळे येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाबरोबरच देशभक्ती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, वृक्षारोपण, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा, आरोग्य, स्वछता अशा विविध सामाजिक विषयांवर आपल्या कलेतून प्रेक्षकांचे प्रबोधन ही केले.

आणि… घोड्यावर स्वार होऊन.. छत्रपती शिवरायांची स्वारी भर कार्यक्रमात आली……
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे बहुधा तालुक्यात प्रथमच “छत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर स्वार होऊन रंगमंचावरील प्रवेश” उपस्थित रसिकांनी केलेला छत्रपती शिवरायांच्या नावाच्या गर्जनेने भारावून गेले. हे “शिवमय” झालेले वातावरण सर्व प्रेक्षकांना स्फूर्तीचे व आकर्षणाचे ठरले.

यावेळी पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वंदनाताई जगताप, सिनेअभिनेते गिरीश आगलावे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद जगताप, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सहसचिव महादेवराव माळवदकर पाटील, शिक्षक संघाचे नेते दत्तात्रय गायकवाड, पत्रकार तानाजी झगडे पत्रकार रमेश लेंडे, पत्रकार संदीप झगडे, मल्हार राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिदास रत्नपारखी, जेजुरी हक्क कृती समितीचे अध्यक्ष राहुल मंगवाणी, सामाजिक कार्यकर्ते दत्ताआबा भोईटे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित जगताप, माजी सरपंच राहुल तात्या भोसले इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक गोविंद यांनी केले सूत्रसंचालन विकास भोसले तर आभार शाळेच्या सहशिक्षिका शारदा चव्हाण यांनी मानले.