1995 पासून एकही निवडणूक न हारलेले मुख्यमंत्री रघुवर दास पराभवाच्या वाटेवर ?

रांची : वृत्तसंस्था – झारखंड विधानसभा निवडणुकीचा आतापर्यंतचा जो कल समोर आला आहे त्यात भाजपच्या हातातून सत्ता निसटताना दिसत आहे. मुख्यमंत्री रघुवर दास हेही पिछाडीवर आहेत. त्यांच्या पक्षातील बंडखोर नेते सरयू राय यांच्याकडून दास यांच्या पराभवाची दाट शक्यता आहे. औद्योगिक नगरी जमशेदपूर पूर्व मधून सरयू राय मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या तुलनेत 10 हजारांहून अधिक मतांच्या अंतराने आघाडी घेताना दिसत आहेत. दास यांच्या हरण्याची शक्यता जास्त आहे कारण मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आहे.

सरयू राय रघुवर दास यांच्याच सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. जमशेदपूरमधून तिकीट न दिल्यानं सरयू राय यांनी निवडणुकीआधी बंडखोरी केली. त्यांनी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्याविरोधात मुजफ्फरपूर पूर्व मधून अपक्ष अर्ज भरला होता.

1995 पासून रघुवर दास निवडणूक लढवत आहेत. आतापर्यंत कोणीच त्यांचा पराभव केलेला नाही. निवडणुकीपूर्वी सरयू राय यांनी भाजपकडून जमशेदपूर पश्चिममधून विधानसभेसाठी तिकीट मागितलं होतं. परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधातच दंड थोपटले.

सरयू राय तेच नेते आहेत ज्यांनी चारा घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. सध्या लालू प्रसाद यादव रांचीतील जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. सरयू राय यांनीच मधु कोडा यांच्या सरकारच्या काळात 4 कोटींच्या मायनिंग घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/