कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी नक्षलवादाचा ठपका ठेवून लोकांना तुरूंगात टाकले !

कोलकाता : वृत्तसंस्था-सध्या देश हा मोठ्या संघर्षाला सामोरे जात आहे. भाजपच्या साडेचार वर्षांच्या राजवटीत गरीब, अल्पसंख्याक आणि दलितांचे मोठे शोषण झाले आहे. प्रादेशिक पक्षांच्या या महाआघाडीमध्ये भाजपला पराभूत करण्याचे सामर्थ्य आहे, असं गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महासभा भरवली होती. या सभेत मेवानी बोलत होते.

कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणी कार्यकर्त्यांना नक्षलवादी असल्याचा ठपका ठेऊन तुरूंगात टाकले. त्यांची सुटका करण्याचे काम आम्हाला करायचे आहे. देशभरातील सेक्‍युलर पक्षांचे सरकार दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर पहिले काम ते करायचे आहे. त्यासाठी आगामी निवडणुकीत भाजप-आरएसएसला पराभूत करा, असं आवाहन जिग्नेश मेवानी यांनी दिले. तसंच केंद्रात महाआघाडीचेच सरकार येईल. त्यानंतरच राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी होईल. तेव्हा देश खऱ्या अर्थाने समाजवादी प्रजासत्ताक बनेल, असं मतही त्यांनी व्यक्त केले.

सभेत पाटीदार नेते हार्दीक पटेल यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला. कधीकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गोऱ्यांविरोधात लढाईची हाक दिली होती. आम्ही आता चोरांविरोधात लढत आहोत. सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणल्याबद्दल ममता बॅनर्जी यांचे आभार. या सभेला जमलेल्या गर्दीतून हे स्पष्ट होते की भाजपची आता जाण्याची वेळ झाली आहे, असं हार्दीक पटेल यांनी म्हटलं आहे.