कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचा झेंडा ‘इतिहास’जमा, सचिवालयावर आता फक्त फडकला ‘तिरंगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर श्रीनगर सचिवालयातून राज्य ध्वज काढण्यात आला असून आता तिथे राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला जात आहे. गेल्या आठवड्यापर्यंत येथे दोन्ही ध्वज एकत्रपणे फडकवले जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की आता सर्व सरकारी कार्यालयांवर केवळ तिरंगा लावण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरमधून संसदेने कलम ३७० काढून टाकल्यानंतर त्याअंतर्गत राज्याला देण्यात आलेला विशेषाधिकार रद्द करण्यात आला आहे.

कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरला स्वतंत्र संविधान, ध्वज आणि दंड संहिता होती. पण कलम ३७० हटवल्यानंतर आता भारतीय राज्यघटना तेथे लागू होईल. सरकारी इमारतींवर तिरंगा फडकावला जाईल आणि भारतीय दंड संहितेचे पालन केले जाईल. यापूर्वी बाहेरील व्यक्तीकडून येथे जमीन खरेदी करण्यासही बंदी होती. ही तरतूदही संपुष्टात आली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखला दोन स्वतंत्र केंद्र शासित प्रदेशांत विभागले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून सध्याच्या जम्मू-काश्मीर राज्याचे राज्यपाल हे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर असतील. विधानसभेचा कार्यकाळ आता ६ वर्षांऐवजी ५ वर्षे असेल.

कलम ३७० हटविणे हे केंद्र सरकारसमोरील मोठे आव्हान होते. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था पाहता काश्मीर घाटीत ३५ हजाराहून अधिक सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे. तथापि, अनुच्छेद ३७० काढून टाकल्याच्या ३ आठवड्यांनंतर बर्‍याच भागात कर्फ्यू आता शिथिल करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणे रस्त्यावर लोकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जात आहेत. सरकारी कार्यालयांमध्येही काम सुरू झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like