सैन्यात जाण्यासाठी ‘वॉचमन’चा आधार घेणं पडलं महागात ! झाली 21 लाखांची फसवणूक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका पहारेकऱ्यानं तिघा तरुणांची तरुणांची सैन्य दलात नोकरी लावतो म्हणून तब्बल 21 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर भारतीय सेनेचा लोगो आणि सही शिक्का असलेले बनावट आयडेंटीटीकार्ड (Fake identity card)सुद्धा त्यानं पैसे घेऊन तातडीनं दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. संबंधित संशयित शिवाजी विद्यापीठातील पहारेकरी तानाजी कृष्णा पवार (रा. कासार पुतळे, ता. राधानगरी) आणि रोहित मारुती मुळीक (रा. भादवण, ता आजरा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी फड (मूळ लातूर, सध्या पुणे) यांच्यासह इतरांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, फिर्यादी शिवाजी मूळचा लातूर जिल्ह्यातील आहे. शिवाजी हा शुभंग बाळू राठोड व त्याचा मित्र कृ्ष्णा दिगंबर पुट्टेवाड (रा. अहमदपूर, जि लातूर) सोबत सैन्य भारतीसाठी कोल्हापूरात आला होता. तिथे त्यांची ओळख पहारेकरी तानाजी पोवारशी झाली. तिथं तानाजीनं मी सैन्य दलातून निवृत्त आहे. सैन्यदलात चांगली ओळखही आहे. तुम्हाला भरती करतो असं त्यानं सांगितलं. त्यानंतर काही कालावधीनं सैन्यदलातील वेगवेगळ्या ठिकाणी जाताना राठोड आणि पुट्टेवाड यांची ओळख झाली. राठोड आणि पुट्टेवाड यांनीही तानाजी सैन्यभरती करतो असं शिवाजीला सांगितलं होतं. कोल्हापुरात त्यांनी तानाजीची भेट घालून दिली होती.

वर्षापूर्वी शिवाजी हा मित्र नवनाथ मुंडे (रा बीड), संग्राम राठोड (जि. नांदेड), रहिम पीरवाले (उदगीर, जि. लातूर) यांच्यासह पोवारला भेटला. कोणतीही परीक्षा न देता थेट कॅन्टोन्मेंट बोर्डात नोकरीत नियुक्तीपत्र देतो, परंतु त्यासाठी प्रत्येकाला 8 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. यानंतर मित्र रहिम पीरवालेनं 14 सप्टेंबर 2019 ला कृष्णा पुट्टेवाडशी संपर्क साधला. पीरवाले आणि त्याचे वडिल जमीलसाब विद्यापीठात तानाजी पोवारला येऊन भेटले. सैन्यदलात नोकरीसाठी रहिमनं तानाजीला रोख 6 लाख रुपयांचा चेक दिला. तानाजीनं त्याच दिवशी सैन्य दलात नियुक्तीचं पत्र दिलं.

3 ऑक्टोबर 2019 रोजी शिवाजी शिवम राठोडसह संग्राम राठोड, नवनाथ मुंडे, शिवाजीचे भाऊजी रत्नाकर मुरकुटे कोल्हापुरात आले. त्यावेळी शुभम राठोडनं तानाजी पोवारला सैन्य दलात नोकरी लावण्याबाबत भेट घालून दिली. राठोडनं तानाजीला रोख 7 लाख रुपये दिले. आधारकार्ड, पॅन कार्ड, बारावी बोर्डाचे प्रमाणपत्र अशी मूळ कागजपत्रे दिली. त्यावेळी राठोडला सैन्य दलातील नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं. काही दिवसांनी शिवाजीनं भाऊजी रत्नाकर मुरकुटे यांना 8 लाख रुपये रोख दिले आणि कोल्हापुरात पोवारला भेटण्यासाठी पाठवून दिलं.

10 ऑक्टोबर 2019 रोजी मुरकुटे व नवनाथ मुंडे यांचा भाऊ धनंजय मुंडे कोल्हापुरात आले. तानाजी पोवारची विद्यापीठात भेटत घेतली. नोकरी लावण्यासाठी शिवाजीची रोख रक्कम 8 लाख रुपये, नवनाथ मुंडेच्या नोकरीसाठी भाऊ धनंजयनं आणलेले 8 लाख असे एकूण 16 लाख रुपये त्यांनी पोवारला दिले. त्याच दिवशी पोवारनं शिवाजी व नवनाथच्या नावानं सैन्य दलात नोकरीचे नियुक्तपत्र दिले. पीरवाले याला आर्मी कॅम्प बागडोरा (पश्चिम बंगाल) इथं हजर राहण्यास सांगितलं. त्यामुळं पीरवाले तिकडं विमानानं निघून गेला.

शिवाजीसह संग्राम राठोड, नवनाथ मुंडे यांना आर्मी कॅम्प (झाशी) इथं हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं. 14 ऑक्टोबर 2019 ला तिघंही रेल्वेनं पोहोचले. तेथून तानाजी पोवारला दूरध्वनी केल्यावर आर्मी कॅम्पमधील व्यक्ती नेण्यासाठी येईल मात्र 7-8 दिवस तिथंच खोली घेऊन राहण्यास सांगण्यात आलं. खर्चासाठी पैसे पाठवत असल्याचं सांगून तानाजी पोवारनं राठोडला ऑनलाईन पैसे पाठवले.

यानंतर 8 दिवसांनी शिवाजीला एक तरुण भेटला. तिथं कॅन्टोन्मेंट बोर्डाचे फोटो, शिक्का, सही व नाव, क्रमांक असलेलं ओळखपत्र दिलं. तो तरूण शिवाजी आणि नवनाथला झाशीतील आर्मी कॅम्पमध्ये घेऊन गेला. नंतर कळालं की, त्याचं नाव वीरेंद्र आहे. त्यानं दोघांकडून कॅम्पमधील कचरा काढणं, रंगरंगोटी काढण्याची काम आठ दिवस करून घेतली. त्यानंतर शिवाजीसह इतरांना देखील फसवल्याचा संशय आला. यानंतर शिवाजी तानाजी पोवारला वारंवार संपर्क करू लागला. परंतु पोवार त्याला टाळत होता त्यामुळं तिघंही झाशीहून गावी परत आले. पोवारला कोल्हापुरात येऊन भेटले. सर्व हकीकत सांगितली.

यानंतर पोवारनं दुसऱ्या सैन्यदलाच्या कॅम्पमध्ये व्यवस्था करतो असं सांगितलं. परंतु याला नकार देत सर्वांनी पैसे परत करण्याचा तगादा लावला. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आपली फसवणूक झाली आहे तेव्हा त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2019 ते 27 डिसेंबर 2020 दरम्यान फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक समाधान धुगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.