अहमदनगर : …२९ जुलै विश्वासघात दिवस म्हणून पाळणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत ज्यादिवशी धनगर समाजाला आश्वासन दिले, तो 29 जुलै हा दिवस ‘विश्वासघात दिवस’ म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे,  असा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आज दुपारी नगरमध्ये पत्रकार परिषदेत केला आहे.
ढोणे म्हणाले की, 2014 च्या विधानसभा निवडणूक अगोदर प्रचार करताना भाजप आणि मित्रपक्षांनी आमचे सरकार निवडून आले तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षणा दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यातून धनगर समाजाची मते आपल्या पदरात पाडून घेतली. मात्र याचा विसर आता सरकारला पडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. गेल्या साडेचार वर्षात आश्वासनाशिवाय धनगर समाजाला आरक्षण अजूनही मिळालेले नाही.

2014च्या निवडणुकीत यादी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मोठे आंदोलनही उभारले होते. मात्र त्या आंदोलनाचा फायदा फक्त राजकर्त्यांनी मतांसाठी घेऊन आपली सत्तास्थाने बळकट केली आहेत. बारामती येथे धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण चालू असताना तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडवणीस त्याठिकाणी आले होते.

त्यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले होते की आमची सत्ता आल्यास आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न मार्गी लावू आणि उपोषण सोडण्यात आले होते. मात्र आता याला अनेक वर्षे होऊनही सरकार आपले आश्वासन विसरले असल्याने 29 तारखेला ‘विश्वासघात दिन’ पाळला जाणार आहे. धनगर समाजाचा हा गोड बोलून केलेला विश्वासघात आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचा निषेध करण्याची भूमिका तरूणांनी घेतली आहे.

त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत ज्यादिवशी धनगर समाजाला आश्वासन दिले तो 29 जुलै हा दिवस ‘विश्वासघात दिवस’ म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. या दिवशी तमाम धनगर समाजाने लोकशाही मार्गाने फडणवीस सरकारचा निषेध करावा, तसेच समाजाचा विश्वासघात कसा केला, यावर चर्चा करण्यासाठी बैठका आयोजित कराव्यात, असे आवाहन ढोणे यांनी केले आहे.

  त्यादिवशी सोशल मिडीयावर फडणवीस यांच्या निषेधार्थ आभियान चालवले जाणार आहे. यातून फडणवीसांचा खरा चेहरा लोकांसमोर जाईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे ढोणे म्हणाले.