‘त्या’ कारागृह अधिकाऱ्याची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरु

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन-कोल्हापूरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात एक कुख्यात बंदी डॉ. संतोष गुलाब पोळ हा कारागृहात रिव्हॉल्वर सदृश्य वस्तू घेऊन फिरत असल्याची चित्रफित व्हायरल झाली आहे. एका चित्रफितीमध्ये वाई हत्या कांडातील संशयित आरोपी डॉ. संतोष गुलाब पोळ हा न्यायालयीन बंदी दिसत असून तो मुलाखत देताना दिसत आहे. चित्रफित व्हायरल झाल्यानंतर कारागृह अधिकारी चंद्रकांत आवळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ऑगस्ट २०१६ मध्ये सातारा जिल्ह्यातील वाई येथे मंगल जोधे यांची हत्या करणाऱ्या डॉ. पोळ (वय ५० रा. धोंड, ता, वाई, जि. सातारा) याने ज्योती पांडुरंग मांढरे (वय २५, रा.वाई) या मैत्रिणीच्या मदतीने ६ हत्या २००३ ते २०१६ या कालावधीत केल्या होत्या. या प्रकरणी डॉ. पोळ ऑगस्ट २०१६ पासून कळंबा कारागृहात न्यायालयीन कैदी म्हणून आहेत. दरम्यान, पौळ हा कारागृहातील बरॅकमध्ये पिस्तुल हातात घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी (27 नोव्हेंबर) व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. कारागृहात त्याच्याकडे पिस्तुल आणि मोबाइल आला कुठून यासंबंधी बुधवारी (२८ नोव्हेंबर) वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे. पश्चिम विभाग कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे या कोल्हापुरात दाखल झाल्या आहे. त्यांच्याकडून कैदी पोळची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. कारागृह अधिकारी चंद्रकांत आवळे यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचेही जबाब घेण्यात आले आहेत.

डॉ. संतोष गुलाब पोळ याने मोबाइल फोनवर दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, सातारा कारागृहात असलेली त्याची साथीदार ज्योती मांढरे हिने ही रिव्हॉल्वर सातारा कारागृहातील सुभेदार राजाराम कोळी यांच्याकडे दिली होती. त्यासाठी आर्थिक घेवाण-देवाण केली आहे. चित्रफित बनवण्यासाठी माझ्या जवळ असलेला मोबाइल हा वरिष्ठ तुरुंग अधिकारी चंद्रकांत आवळे यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत सात वेळा दिला आहे.