Mumbai : पोलीस चौकशीची चिन्हं दिसताच कंगनाची हायकोर्टात धाव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा ती वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्येदेखील करते. आता कंगनाती धावपळ सुरू झाली आहे. वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पोलीस चौकशीच्या आदेशाविरोधात कंगनानं आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती तिनं याचिकेद्वारे केली आहे.

वांद्रे न्यायदंडाधिकारी कोर्टानं 16 ऑक्टोबर रोजी, 2 समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि समाजातील सौदार्हपूर्ण वातावरण व जातीय सलोखा बिघडेल अशा हेतूनं सोशल मीडियावर वारंवार विधानं केल्याच्या आरोपांनंतर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी कंगना आणि तिची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेल यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला. यात भारतीय दंड संहितेच्या 124 अ (देशद्रोह) या कलमासोबतच 153 अ (धार्मिक व जातीय सलोखा बिघडवणं) आणि 295 अ (धार्मिक भावना दुखावणं) या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.

यानंतर आता कंगना आणि रंगोली यांनी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला आव्हान देण्यासोबत एफआयआर रद्द करण्याची मागिणी याचिकेद्वारे केली आहे.