माझ्या आनंदात कोणीच सहभागी झाले नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या आनंदात कोणीच सहभागी झाले नाही असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौत हिने आपले दु:ख व्यक्त केले आहे. इंडस्ट्रीने कायमच माझ्याकडे दुर्लक्ष केलं असंही ती म्हणाली आहे. मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी हा कंगणाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने आतापर्यंत ७६.६५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात कंगनाने झांशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका वठविली असून या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एकीकडे या चित्रपटाला यश भेटत आहे तर दुसरीकडे काही नवे वादही निर्माण होताना दिसले आहेत. मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतानाच कंगनाने आता बॉलिवूड सेलिब्रिटींवर आपली तोफ डागली आहे.

बॉलिवूडमधील सारी सेलिब्रिटी मंडळी माझ्याविरोधात एकत्र आली आहेत

कंगणा म्हणाली की, “सध्या बॉलिवूडमधील सारी सेलिब्रिटी मंडळी माझ्याविरोधात एकत्र आली आहेत. मी पहिल्यांदाच दिग्दर्शनाचं धनुष्य उचललं आणि ते लिलया पेललही. त्यामुळे माझ्यावर सध्या सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र कालविश्वतील एकाही कलाकाराने माझी कौतुकाने पाठ थोपटली नाही. आमिर खान, ट्विंकल खन्ना, आलिया साऱ्यांच्या यशाचं मी कौतुक केलं होतं. मात्र माझ्या आनंदात हे कोणीच सहभागी झाले नाहीत.”

‘हे सारे संधीसाधू लोक आहेत’

पुढे बोलताना कंगणा म्हणाली की, “इंडस्ट्रीने कायमच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या चित्रपटाच्या ट्रायलमध्ये कोणताही कलाकार बोलवल्यानंतरही येत नाही. मात्र त्यांच्या चित्रपटाचं ट्रायल असेल तेव्हा हेच कलाकार मला आवर्जुन फोन करुन बोलवतात. त्यामुळे आता मीदेखील त्यांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला जाणं सोडून दिलं आहे. आमिर खानने त्याच्या ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ या दोन्ही चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी बोलावलं होतं. यावेळी त्याने मोठ्या आपुलकीने माझ्याशी गप्पा मारल्या होत्या. मात्र ‘मणिकर्णिका’सारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची साध्या एका ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे आता मला एक समजलं आहे हे सारे संधीसाधू लोक आहेत.