UP : 8 पोलिसांचा ‘मारेकरी’ विकास दुबेचा ‘नंबरकरी’ अमर दुबेचा एन्काऊंटर, STF नं हमीरपूरमध्ये केलं ‘खल्लास’

लखनऊ : कानपुरमध्ये आठ पोलीस कर्मचार्‍यांचा जीव घेणारा विकास दुबे आणि त्याच्या गँगचा शोध घेण्याचा वेग वाढला आहे. पोलिसांनी बुधवारी सकाळी विकास दुबेचा उजवा हात समजल्या जाणार्‍या अमर दुबेला ठार केले. हमीरपुरच्या मौदाहामध्ये पोलीस आणि अमर दुबेमध्ये चकमक झाली, यामध्ये अमर दुबेला ठार करण्यात आले.

कानपुरमध्ये आठ पोलीस कर्मचार्‍यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी विकास दुबेच्या गँगमधील अमर दुबे हा सर्वात जवळचा होता. या हत्याकांडातील पाहिजे असलेल्या आरोपींच्या वायरल पोस्टमध्ये अमर दुबेचे नाव पहिल्या नंबरवर होते. एसटीएफ आणि हमीरपुर पोलिसांनी बुधवारी सकाळी त्याचे एन्काऊंटर केले.

तर, विकास दुबेचा शोध घेण्याची मोहिम आणखी गतिमान करण्यात आली आहे. विकास दुबे फरीदाबादच्या एका गेस्ट हाऊसमध्ये असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती, परंतु पोलिसांना तेथून रिकाम्या हाती परतावे लागले. सूत्रांनी सांगितले की, यूपी पोलीसांच्या या अपयशामुळे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खुप नाराज आहेत. यादरम्यान कानपुरच्या चौबेपुर पोलीस ठाण्याच्या सर्व 68 पोलीस कर्मचार्‍यांना लाइनअप केले गेले आहे.

फरीदाबादच्या गेस्ट हाऊसमध्ये पोलिसांची छापेमारी
दिल्लीलगतच्या फरीदाबादमधील एका गेस्ट हाऊसमध्ये विकास दुबे लपून बसल्याची खबर मिळाली होती. यानंतर पोलीस गेस्ट हाऊसवर पोहचले. प्रत्यक्षदर्शींच्यानुसार सुमारे 30 ते 35 पोलीस कर्मचार्‍यांनी अचानक गेस्ट हाऊसमध्ये छापा मारला. यावेळी ते सर्व साध्या गणवेशात होते.

काही वेळ गेस्टहाऊसमध्ये तपासणी केल्यानंतर पोलीस निघून गेल्ले, परंतु काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गेस्टहाऊसमधून फायरिंगचा आवाजसुद्धा ऐकू आला. मिळालेल्या माहितनुसार पोलिसांनी येथे विकास दुबेच्या एका साथीदाराला हत्यारांसह पकडले आहे. यासोबतच पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामध्ये दिसत असलेला व्यक्ती विकास दुबे असण्याची शक्यता आहे.

विकास दुबेला अटक न झाल्याने सीएम योगी नाराज
गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी युपी पोलिसांनी 50 पेक्षा जास्त टीम तयार केल्या आहेत, परंतु अजूनही यश आलेले नाही. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अजूनपर्यंत विकास दुबेला पकडण्यात न आल्याने नाराज आहेत. सीएमची नाराजी डीजीपी, पोलिसदलाचे प्रमुख अधिकारी आणि गृहविभागाच्या अधिकार्‍यांवर आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विकास दुबेच्या अटकेसाठी सुरू असलेल्या छापेमारीचे प्रत्येक अपडेट स्वत: घेत आहेत. उत्तर प्रदेश प्रत्येक कानाकोपरा शोधत आहेत. एसटीएफने लखनऊ येथील विकास दुबेच्या घरावर सुद्धा छापा मारला आणि घरात ठेवलेल्या कागदपत्रांचा शोध घेतला.

निकटवर्तीय जय वाजपेयी अटकेत
पोलिसांनी कानपूरमधून विकास दुबेचा निकटवर्तीय जय वाजपेयी यास अटक केली आहे. जय, विकास दुबेच्या फायनान्सचे काम पाहतो. तिकडे बिकरु गावात विकास दुबेच्या घरी लागोपाठ चौकशी सुरू आहे. पोलिसांनी येथून स्फोटके, काडतूस आणि बनावट आयडी कार्ड जप्त केले आहेत.