Kerala : तिकीट न मिळाल्याने कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याने केले भर चौकात ‘मुंडण’

तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था – केरळमध्ये विधानसभा निवडणुकीच्या वातावरणाने रंग भरले आहे. दरम्यान येथे तिकीटवाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने संतप्त झालेल्या केरळ महिला काँग्रेसच्या प्रमुख लतिका सुभाष यांनी तिरुवनंतपुरममधील भर चौकात पक्षकार्यालयासमोर चौकात मुंडण केले आहे. तसेच पक्षाचा राजीनामाही दिला आहे.

केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. येथे सत्ताधारी डावी आघाडी (एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी (यूडीएफ) यांच्यात चुरस आहे. वायनाडमधून विजय संपादन करून लोकसभेत पोहचल्यानंतर कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केरळमध्ये विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. मात्र येथे तिकीटवाटपावरून नाराजीनाट्य सुरु झाले आहे. लतिका सुभाष यांनी पक्षाने तिकीट न दिल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. मी कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करत नाही, मात्र मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सुभाष यांनी म्हटले आहे.