फुटबॉलवेडा नवरदेव…! नवरीला ‘पाच मिनिटांत येतो’ म्हणाला, थेट गाठले मैदान 

कोची : वृत्तसंस्था – आपल्याकडे क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांच्या वेडापायी लेक्चर बंक केल्याचे, परीक्षा चुकवल्याचे किस्से आपण अनेकदा ऐकले असतील पण फुटबॉल वेड्या एका पठ्ठ्याने चक्क पाच मिनिटात येतो असे सांगून फुटबॉलचे मैदान गाठले. केरळच्या रिदवाननं ही करामत केली आहे. विशेष म्हणजे त्याने लग्न आणि फुटबॉल सामना दोन्हीमध्ये बाजी मारली. पण तो लग्न मंडपात येईपर्यंत लग्न मांडवातल्या सर्वांचीच हसावे की रडावे अशी स्थिती झाली होती.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, केरळ येथे होणाऱ्या मल्लपुरन 7-a-side फुटबॉल स्पर्धेतील फिफा मंजेरी या संघातीत रिदवान हा प्रमुख खेळाडू… मात्र, फिफा मंजेरी संघाच्या या बचावपटूसमोर मोठा पेच निर्माण झाला. संघाची अंतिम लढत आणि त्याच्या लग्नाची तारीख एकाच दिवशी आल्याने त्याच्यासमोर यक्षप्रश्नच निर्माण झाला. त्याला फुटबॉल किंवा लग्न यापैकी एकाचीच निवड करायची होती आणि मंजेरी संघाला त्याची अत्यंत गरज होती.

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही घेतली दखल 

कोणाच्याही आयुष्यात हा प्रसंग आला तर तो नक्कीच फुटबॉलला दुय्यम प्राधान्य देईल. मात्र, या पठ्ठ्याने लग्नाच्या दिवशी होणाऱ्या नवरीकडे फुटबॉल मॅच खेळण्यासाठी पाच मिनिटे मागून मैदानावर धाव घेतली. नशीबाने तो परत आला तो जेतेपदाचा चषक उंचावूनच. पण, त्याच्या या कृत्याने नवरीकडच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड नाराज झाले होते. एका सामन्यासाठी रिदवानने केलेले कृत्य पाहून नवरीनेही आश्चर्य व्यक्त केले. जर ही मॅच सायंकाळी असती, तर तु लग्न रद्दही केले असते का, असा सवाल होणाऱ्या नवरीने केला. रिदवानच्या या फुटबॉलप्रेमाची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही घेतली आणि त्यांनी रिदवानची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.