सरकारी कॉलेजमध्ये फडकलं वादग्रस्त ‘पोस्टर’, ‘भारत आपला देश नाही’ असे लिहीलं होतं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केरळमधील काही शासकीय महाविद्यालयांमध्ये भारता विरोधी वादग्रस्त पोस्टर्स लावण्याचे प्रकरण पुढे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार महाविद्यालयाच्या भिंतीवर वादग्रस्त पोस्टर लावले गेले होते, त्यावर ‘भारत माझा देश नाही’ असे लिहिले गेले आहे. ही पोस्टर्स गव्हर्मेंट ब्रेनन कॉलेज थालासेरी आणि शासकीय आयटीआय महाविद्यालय मलापुझा येथे आढळली आहेत. या पोस्टर्सखाली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नाव लिहिले गेले होते. दरम्यान, या महासंघाने हे पोस्टर्स लावण्यास नकार दिला आहे.

या पोस्टरवर मल्याळममध्ये लिहिले होते की, ‘भारत माझा देश नाही. हे वाईट लोक माझे भाऊ व बहिणी नाहीत. मला अशा देशावर प्रेम नाही, किंवा सध्याच्या परिस्थितीचा मला अभिमान नाही. अशा वातावरणात आणि अशा दहशतवाद्यांसह जगताना मला लाज वाटते. ‘

दरम्यान, सब इन्स्पेक्टर धर्मदोम यांनी सांगितले की, कलम 153 अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही पोस्टर्स दिल्लीतील हिंसाचाराशी जोडली जात आहेत.