राज्यात खरीप पीक कर्ज वितरणात कोल्हापूरची आघाडी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील खरीप हंगाम पीक कर्ज वितरण रखडल्याने तक्रारींचा मारा होत असताना कोल्हापूर जिल्ह्याने खरीप पीक कर्ज वितरणामध्ये राज्यात आघाडी घेतली आहे. सहकारी बँकांनी उद्दीष्टाच्या 212 टक्के कर्ज वाटप करून शेतकर्‍यांना हात दिला आहे. कर्जवाटपात प्रारंभी अवघे दोन टक्के वाटा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी आता 54 टक्के तर खासगी बँकांनी 36 टक्के कर्ज वाटप करून समाधानकारक कामगिरी केली आहे.

जिल्ह्यात साडेसोळा लाख शेतकर्‍यांना 1 हजार 717 कोटी रुपयांची रक्कम वितरित झाल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने यांनी सांगितले. खरीप पीक कर्जवाटप हा यंदा पावसाळ्यात वादग्रस्त मुद्दा बनला आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळत नसल्याने किंवा बँका सहकार्य करत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी दिसून आली. पावसाळ्याच्या प्रारंभी बियाणे-खते खरेदीसाठी लगबग सुरू असते पण कर्ज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी विविध पद्धतीने आंदोलन करून निषेध व्यक्त केला होता.

याची दखल घेत कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही बँकांमध्ये ‘स्टिंग ऑपरेशन’ करून कर्ज वाटप न केल्यास कारवाई करावी लागेल असा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवडयामध्ये 589 कोटी रुपये कर्ज वितरण झाले होते. त्यात सर्वाधिक कर्जवाटप जिल्हा बँकेचे 504 कोटी रुपये होते. उद्दिष्टाच्या 48 टक्के कर्ज वाटप होऊन 64 हजार खातेदारांना कर्ज मिळालेले होते.

जूनअखेर कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश भुसे यांनी दिल्यानंतर कर्ज वाटपाला गती मिळाली. आता जुलैच्या तिसर्‍या आठवडयामध्ये कर्ज वाटपाचे प्रमाण बर्‍याच अंशी सुधारलेले आहे.दरम्यान, लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने पॅकेज जाहीर केले आहे. या अंतर्गत प्रत्येक शेतकर्‍याला वित्तसाहाय्य करण्याचा सरकारचा निर्णय निर्धार आहे.