Kolhapur News : ऊस वाहतूकदारांनी चक्क चिअर गर्ल्स नाचवल्या, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा (Video)

कोल्हापूरः पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकार अनेक प्रकारचे निर्बंध लागू करत आहे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी, विना मास्क बाहेर पडू नये असे करत आहे. मात्र सरकारच्या सर्व सूचना पायदळी तुडवण्याचा धक्कादायक प्रकार हळदी परिसरात (जि. कोल्हापूर) घडला आहे. चक्क दारु पिऊन अन् चिअर गर्ल्स नाचवून राडा करण्यात आला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा संपूर्ण फज्जा उडाला होता. तसेच सर्व जण विनामास्क उपस्थित होते. ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकांनी हा राडा घातल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोगावती कारखान्यासाठी काही ऊस चालक ऊस वाहतूक करत होते. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याच्या आनंदात त्यांनी चक्क चिअर गर्ल्स नाचवल्या. मुख्य रस्त्यावरच स्टेज तयार करुन डॉल्बीच्या आवाजात चिअर गर्ल्स नाचत होत्या. दारुच्या नशेतील ऊसतोड कामगार आणि तरुणही त्यांच्यासोबत थिरकत होते. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा चा संपूर्ण फज्जा उडाला होता. तसेच वाहतुकीची देखील कोंडी झाली होती. कोरोनाचे निर्बंध धुडकावून हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे याला जबाबदार असलेल्या ट्रॅक्टर चालकावर काय कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.