कोल्हापूरातील ‘जमावबंदी’चा आदेश अखेर मागे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यात महापुराची अभूतपूर्व पूरस्थिती उद्भवल्यावर समाजातून मोठे मदतकार्य उभे राहत आहे. असे असताना जिल्हा प्रशासने २४ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला. हा आदेश लागू करताना त्यात कोल्हापूरला आलेल्या महापूरामुळे पूरग्रस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे म्हटल्याने या आदेशाविरोधात सरकारवर सर्व स्तरातून जोरदार टिका होऊ लागली. त्यामुळे रात्री उशिरा हा जमाव बंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाने मागे घेतला आहे.

महत्वाचे सण, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा महत्वाच्या दिवसांच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जमावबंदीचा आदेश काढला जातो. इतर वेळी ही तांत्रिक बाब समजली जाते. मात्र, त्यात पूरग्रस्तांचा उल्लेख आल्याने हा टिकेचा विषय झाला.

जिल्हा प्रशासनाने सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास काढलेल्या जमावबंदीच्या आदेशात म्हटले होते की, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापूराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन यातून पूरग्रस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिम बांधवाची बकरी ईद, देशात १५ ऑगस्टला साजरा होणारा स्वातंत्र दिन, २४ ऑगस्टला साजरी होणारी दहीहंडी हे कारण देण्यात आले होते. त्याशिवाय आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष व विविध संघटनांकडून त्याचा मागण्यासाठी आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता.

हा आदेश पाहताच त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला. जनतेतूनही त्याला विरोध होऊ लागला. राज्य शासन महापूराची परिस्थिती हातळण्यास अपयशी ठरल्याने जनतेचा आवाज दाबण्यासाठी त्यांनी हा आदेश काढला. आपले दु:खही जनतेने सरकारकडे मांडायचे नाही का अशा प्रकारे टिका होऊ लागली. सरकार संवेदनशील नाही असा संदेश या आदेशातून जात असल्याचे लक्षात आल्यावर भाजप नेत्यांना त्याचे गांभीर्य लक्षात आले व पाठोपाठ हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर रात्री उशिरा जमाव बंदीचा आदेश मागे घेण्यात आला. जमाव बंदीचा आदेश काढण्यात आल्यानंतर ६ तासात मागे घेण्याच्या नामुश्की सरकारवर आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त