कुणाल कामरा आणि त्याचे आई वडील कोरोनाबाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुन्हा एकदा कोरोनाने सर्वत्रच थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचेही पालन करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. अक्षय कुमार, विकी कौशल, भूमी पेडणेकर, आलिया भट हे त्यापैकीच काही. नुकतीच अशी माहिती मिळाली आहे, की स्टँडअप कॉमेडिय़न कुणाल कामरा आणि त्याच्या परिवारालाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.

कुणाल आणि त्याचे आई वडील अशा तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. ३२ वर्षीय कुणाल सध्या गृहविलगीकरणात आहे. तर त्याचे आई वडील घराजवळच्याच दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. तो म्हणतो, माझे आई वडील करोना पॉझिटिव्ह आहेत आणि ते जवळच्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. मीही करोनाबाधित आहे आणि घरीच क्वारंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांशी मी बोललो आहे. मी आणि माझा परिवार लवकरच यातून बरे होऊ. त्याने सर्वांना कोरोनाची दुसरी लाट गांभिर्याने घेण्याचे आणि भरपूर काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.

भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. दिवसेंदिवस भारतातले करोनाचे रुग्ण वाढच आहेत. रुग्णसंख्या ९०,००० च्या वर जाण्याचा आजचा सलग तिसरा दिवस आहे. सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासात ९६,९८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही करोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्याच अनुषंगाने प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. संचारबंदी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद असे अनेक निर्बंध करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घालण्यात आले आहेत.