सोलापूर विभागासाठी 900 कोटींचा निधी; सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासह कुर्डूवाडी वर्कशॉपला मिळणार गती

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये रेल्वेच्या अर्थसंकल्पाचाही समावेश करण्यात आला. या अर्थसंकल्पात सोलापूर विभागातील मध्य रेल्वेच्या नव्या रेल्वेमार्गासाठी आणि अन्य काम पूर्ण कार्यासाठी ९०० कोटीचा निधीची घोषणा केली आहे. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद रेल्वेमार्गाच्या कामासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुर्डूवाडी वर्कशॉप व अन्य कामासाठी निधीची तरतूद झाली आहे. असे रेल्वे मंत्रालयाने सोलापूर विभागाला दिला असल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेसाठी ४ हजार ८३० तर नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरण, लातूर कोच फॅक्टरी, सोलापूर विभागातून जाणाऱ्या बीड-परळी- वैजनाथ या नव्या मार्गासाठी ५२७ कोटी, सोलापूर- उस्मानाबादसाठी २० कोटी व दौंड-मनमाड यासाठी २५ कोटी, पंढरपूर- फलटण मार्गासाठी १ लाखाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सोलापूर विभागातून धावणाऱ्या ६० टक्के पॅसेजर गाड्या सुरू झाल्या आहेत. याशिवाय काही एक्स्प्रेस गाड्या विशेषगाड्या म्हणून सुरू आहेत. सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता हुतात्मा व इंद्रायणी एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल. शक्यतो मार्च महिन्यात या दोन्ही गाड्या सुरू होतील, तसेच सोलापूर विभागातील नव्या रेल्वेमार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यासंदर्भातील DPR तयार झाला आहे. हा DPR मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यास भूसंपादनाचे काम सुरू होईल, त्यानंतर टेंडर प्रक्रिया होईल, त्यानंतर रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी किमान २ ते ३ वर्षे लागतील. या मार्गाच्या कामासाठी आणखीन ३०० कोटी रुपयांची गरज असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.