‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लागिरं झालं जी या मालिकेत जिजी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांच दीर्घ आजाराने बंगळुरू येथे शनिवारी (दि १४ ) निधन झाले. ऐन दिवाळीमध्ये त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून नातवंडं असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर कराड येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

प्रसिद्ध मालिका लागिरं झालं जीमधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी त्यांची ओळख आहे.त्यांनी शिक्षकी पेशा सांभाळात अभिनय क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका होत्या. लागिरं झालं जी या मालिकेतून त्या घराघरात पोहचल्या होत्या. जिजी या नावानेच त्या परिचितही झाल्या होत्या. देवमाणूस या मालिकेतही त्या काम करत होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.