लायन्स क्लबच्या बैठकित ‘लैला ओ लैला’ 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-अनेक सामाजिक उपक्रम राबवून अनेकांना मदत करणारी संस्था म्हणून लायन्स क्लबकडे पाहिले जाते. मात्र, उपक्रम राबवण्याच्या नावाखाली या क्लबच्या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या पैशांवर दारु पिऊन आणि महिला नाचवून पैशांची उधळपट्टी चालू केली आहे. त्यामुळे या क्लबला मदत तर कशी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. असाच प्रकार रविवारी (दि.२१) घडला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

रविवारी (दि.२१) पुणे मुंबई महामार्गावरील भजन सिंग ढाबा येथील ब्लॅक स्टॅलीयनमध्ये लॉयन्स क्लबच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याचे आयोजन स्पोर्टस प्रमुख वसंत कोकणे आणि सध्याचे क्रिकेट चेअरमन भुपेंद्र धुल्लट यांनी केले होते. या बैठकीत क्रिकेट सामने आयोजीत करण्यावर चर्चा घेण्यात येणार होती. या बैठकीसाठी ७० ते ८० सदस्य यावेळी उपस्थित होते. मात्र, क्रिकेटच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांवर क्लबच्या सदस्यांनी दारुचे पेग रचत बायका नाचवत पैशांची उधळपट्टी केली. हा प्रकार काही सदस्यांना आवडला नसल्याने त्यांनी क्लबमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

लॉयन्स क्लबच्या वतीने लॉयन्स प्रिमीअर लिग २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. या लिगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची निवड लिलावातून करण्यात आली. रविवारी भजन सिंग ढाबा येथील ब्लॅक स्टॅलियन येथे खेळाडूंच्या लिलावाचा कार्य़क्रम ठेवण्यात आला होता. क्रिकेट स्पर्धेत टीम विकत घेतलेले माजी प्रांतपाल राजू राठोड हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत सध्याच्या सदस्यांनी दारु पिऊन बायका नाचवत त्यांच्या बरोबर नाच देखील केला. लायन्स क्लबकडे आज समाज एक चांगली संस्था म्हणून पहाते. मात्र, या संस्थेचे सदस्य लोकांकडून क्रिकेटच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांवर एैयाशी करताना दिसून आले. हि लज्जास्पद बाब असून हा प्रकार आज पर्य़ंतच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते ते या वेळी घडले.

सामाजीक उपक्रम राबवण्यासाठी लायन्स क्लबकडून डोनेशनच्या नावाखाली पैसे गोळा केले जातात. नागरिकदेखील सामाजिक उपक्रमात आपला देखील हातभार लागावा या हेतूने आर्थिक मदत करत असतात. परंतु हेच पैसे जर सामाजिक उपक्रमाऐवजी दारु आणि एैयाशी करण्यात खर्च करीत असतील तर काय उपयोग. रविवारी जो प्रकार घडला त्याचा व्हिडीओ क्लबच्या सदस्यांनी व्हायरल केला असून तो पोलीसनामाच्या हाती लागला आहे. या व्हिडीओमध्ये क्लबचे सदस्य दारु पिऊन महिलेसोबत नाचत आहेत. तसेच अश्लिल हावभाव करुन नाचताना दिसत आहेत.

क्लबने आयोजन केलेल्या लिगमध्ये सहा संघ असणार असून या संघ प्रमुख यांचे कडून ६० हजार रुपये घेण्यात आले आहेत. तर प्रत्येक खेळाडूकडून अडीच हजार रुपये देणगी स्वरुपात घेण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी प्रायोजक आहे. त्यामुळे जमा झालेला पैसा अशा पद्धतीने उधळणे चुकीचे असून हा पैसा चांगल्या उपक्रमासाठी वापरला जाणे अपेक्षीत असल्याचे मत काही सदस्यांचे आहे.

घडलेल्या प्रकाराबाबत लॉयन्स क्लबच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी प्रांतपाल राजू राठोड हे यावेळी उपस्थित असताना सदस्यांनी असा धिंगाणा घातला. राठोड यांनी या सदस्यांना थाबवायला पाहिजे होते. मात्र राठोड यांनी त्यांना न थांबवता एक प्रकारे असे कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले आहे. हे चुकीचे असल्याचे मत नाराज सदस्यांनी व्यक्त केले आहे. तसेच सध्याचे प्रांतपाल रमेश शहा यांनी यामध्ये लक्ष घालून हे क्रिकेट सामने रद्द करावेत अशी मागणी नाराज सदस्यांनी केली आहे. तसेच लॉयन्स क्लब मधील क्रिकेट प्रेमींनी देखील अशा प्रकारची मागणी करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रांतपाल रमेश शहा काय भूमिका घेतात हे पाहणे उचीत राहणार असल्याचे सांगून घडलेला प्रकार हा निंदनीय असल्याचेही सदस्यांनी सांगितले.

या प्रकरणी प्रांतपाल रमेश शहा यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.