Jalgaon News : माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला जाणार्‍या पतीचा अपघाती मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला दुचाकीवरून जाताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी समोरच्या कंटेनरवर आदळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला एकजण गंभीर जखमी झाला. रविवारी (दि. 17) दुपारी एकच्या सुमारास जळगाव महामार्गावर अजिंठा चौकापासून काही अंतरावर हा अपघात झाला.

समाधान श्रीराम चंदन (रा. तरसखेडा, ता. येवला, जि. नाशिक) हा तरुण जागीच ठार झाला. तर दावल अंबादास बच्छाव (रा.गुजरखेडा, ता. येवला जि. नाशिक) हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान हा भुसावळ येथे माहेरी गेलेल्या पत्नीला घ्यायला दुचाकीवरून निघाला होता. यावेळी त्याच्यासोबत दुचाकीवर दावल बच्छाव हा देखील होता. मात्र भरधाव दुचाकी कंटेनरवर आदळल्याने समाधानचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने अंडरग्राऊंड रस्ता तयार करावा या मागणीसाठी रहिवाशांनी रास्ता रोको करुन महामार्ग अडवला होता. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयावर बैठक घेणार असल्याचे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.