पुन्हा एकदा ‘लातूर पॅटर्न’ची ‘सरशी’ ; १० वीत १००% गुण मिळवलेल्या २० विद्यार्थ्यांपैकी १६ जण लातूरचे

पोलीसनामा ऑनलाइन टीम : नुकताच १० वीचा निकाल लागला. यंदा पास होणाऱ्यांच्या प्रमाणात १२ % घट झाली आहे. अशा परिस्थितीत काही वर्षांपासून बॅकफूटवर गेलेल्या लातूर विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

दहावीच्या निकालात १०० % गुण मिळवलेले एकूण २० विद्यार्थी असून, यात औरंगाबाद विभागाचे ३ विद्यार्थी, अमरावती विभागाचा एक तर लातूर विभागाचे सर्वाधिक १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी राज्यातील १२५ जणांना १००% गुण मिळाले होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेने १०० % गुण मिळवणाऱ्यांची संख्या घटली आहे. गुणांचा फुगवटा देखील कमी झाला आहे. अंतर्गत गुणांना चाप, अभ्यासक्रमातील बदल, कृतीपत्रिकेनुसारची पहिली परीक्षा यांचा परिणाम निकालावर झाल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.

एकूणच, दहावीच्या निकालात एकेकाळी गुणवत्ता यादी, तसेच दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणारे विद्यार्थी यामुळे लातूर पॅटर्नचा मोठा दबदबा पहायला मिळाला होता. गुणवत्ता यादी बंद झाल्यानंतर हा दबदबा कमी झाल्याचे दिसून येत होते. परंतु या वर्षीच्या निकालात १०० % गुण मिळणाऱ्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थी लातूर विभागातील असल्याने लातूर पॅटर्नचे यश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या काही वर्षापासून लातूर पॅटर्नची दहावीच्या निकालात पीछेहाट दिसून आली, मात्र या घवघवीत यशानंतर लातूर पॅटर्नने यशस्वी पुनरागमन केले आहे.

दरम्यान, अभ्यासक्रमात झालेले बदल व कृतीपत्रिकेनुसारची पहिली परीक्षा यांमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रणाम घटले असावे अशी प्रतिक्रिया एसएससी बोर्डाच्या अध्यक्षा डॉ.शकुंतला काळे यांनी दिली.