Nagpur News : 4 लाखाच्या कर्जावर 97 लाखांची ‘पठाणी वसुली’ करणार्‍या माजी पोलिसासह दोघांना अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  4 लाखाचे कर्ज देऊन भरमसाठ व्याज आकारून तब्बल 97 लाख वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका माजी पोलीस कर्मचाऱ्यासह दोघाला पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटातील सावकारांनाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार नागपूर शहरात उघडकीस आला आहे. दोघांवरही अवैध सावकारी आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी जयंता शेलोट आणि विजय शेलोट असे अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघे भाऊ असून जयंता शेलोट हे माजी पोलीस कर्मचारी आहेत. यासंदर्भात पीडित कर्जदार मनीष राऊत यांनी अजनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या भगवाननगर भागात राहणारे मनीष राऊत यांनी आर्थिक अडचणीमुळे जयंता शेलोट आणि त्याचा भाऊ विजय शेलोटकडून वर्ष 2016 मध्ये 4 लाखाचे कर्ज घेतले होते. राऊत यांनी कर्जाची परतफेड म्हणून साडेसात लाख रुपये शेलोट यांना परतही केले होते.

मात्र, कधीकाळी पोलीस दलात राहिलेल्या जयंता शेलोट यांनी मनीष राऊत यांना अडकवण्याचा प्लान बनवला आणि दमदाटी करत तुझे कर्ज फिटले नाही. व्याजासह मुद्दल 97 लाख झाले आहे. त्यामुळे तेवढे पैसे परत कर नाही तर तुझं घर आमच्या नावावर कर असा तगादा लावला होता. मात्र अखेरीस नेहमीच्या दमदाटीला त्रासून राऊत याने पोलिसांचे दार ठोठावले. अजनी पोलीसांनी प्रकरणाचा तपास करून पूर्वश्रमीचा पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींनी यापूर्वीही काही लोकांना अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकवून त्यांचे आर्थिक शोषण केले आहे. कोणाच्या संपत्ती बळकावल्या आहेत का? याचा तपास केला जात असल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे.