आता लोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना प्रवेश नाही

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन
तुम्ही जर पोलीस कर्मचारी असाल आणि पास किंवा तिकाटांशिवाय लोकलच्या प्रथम श्रेणी वर्गातून प्रवास करत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. उपनगरीय लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेच्या फर्स्ट क्‍लासमधून यापुढे मुंबई पोलिसांना वैध पास किंवा तिकिटांशिवाय प्रवास करता येणार नाही. अशा प्रकारचा आदेशच मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी काढला आहे. त्यामुळे आता फर्स्ट क्‍लासमध्ये मुंबई पोलिसांना प्रवेश असणार नाही. जर पोलीस अधिकारी, कर्मचारी फर्स्ट क्‍लासमध्ये वैध पास अथवा तिकिटाशिवाय प्रवास करताना आढळले तर त्याच्यांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

पोलीस अधिकारी ड्युटीवर अनेकदा येताना आणि जाताना तिकिटाशिवाय प्रवास करताना टिसीला दिसून आले आहेत. पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत नव्हती, मात्र कर्तव्यावर नसतानाही अनेक पोलीस अधिकारी फर्स्ट क्लासचा प्रावास करताना आढळले आहेत. काही महिन्यांपूर्वी दादर रेल्वे स्थानकात एका पोलीस शिपायाची आणि काही तिकिट तपासणीसांची जोरदार हाणामारी झाली होती. हा पोलीस शिपाई ऑन ड्युटी नव्हता, तरीही त्याने कुर्ला-दादर असा प्रवास फर्स्ट क्‍लासने केला होता. यावेळी आपण पोलीस असल्याचे सांगून त्याने तिकिट तपासनीस यांच्याशी वाद घातला होता. अखेर दादर रेल्वे पोलिसांनी दोन परस्पर गुन्हे दाखल केले होते. तसेच या पोलीस शिपायाला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. हा आदेश त्यामुळे सतत वाढणाऱ्या घटनांची दखल घेत काढला आहे. एवढेच नाही तर हा आदेश सर्व पोलीस ठाण्यासह इतर विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांनी सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांना वाचून दाखवावा व त्याप्रमाणे कारवाई करावी असे नमूद केले आहे.